रत्नदीप शेजावळे 
जिंतूर(दि-८/९)

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी गंगाखेड येथील नगर परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी नगर परिषद विभाग जिल्हा प्रशासन यांच्याकडे दाखल केलेल्या प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित गंगाखेडचे नगरसेवक तुकाराम तांदळे यांच्या वतीने मंजूर कामाच्या १.५% रक्कम साडेचार लाख रुपयांची लाच घेतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून करभाजने याच्या कक्षात  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे. वरील तिन्ही आरोपींनी साडेचार लाख रुपयांची लाच स्वीकारल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील आरोपींना लाचलुचपत विभागाने कारवाई नंतर अटक केली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशीसह नगर पालिका प्रशासन जिल्हा अधिकारी अव्वल कारकून श्रीकांत विलासराम करभाजने व सिव्हील इंजिनिअर अब्दुल हकीम अब्दुल खय्युम या दोघांचा समावेश आहे. 

सदरील कार्यवाही नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व पोलीस उपअधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अमोल कडू, परभणी लाचलुचपत विभागाचे पोलीस कर्मचारी जमीलोद्दीन जहागीरदार, शेख शकील,अनिल कटारे,माणिक चट्टे,अनिरुद्ध कुलकर्णी, सचिन धबडगे,शेख मुखीद, मुख्तार, सारिका टेहरे, जनार्दन कदम, रमेश चौधरी यांचा आजच्या या यशस्वी कारवाईत समावेश होता.

👉🏻Flash Back
स्वाती सुर्यवंशी

सन २००४/०५ मध्ये कळमनुरी येथे तहसीलदार असताना तत्कालीन शिवसेना आमदार गजानन घुगे यांच्या तक्रारीवरून संजय गांधी निराधार योजना आर्थिक घोटाळ्यावरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. परभणीच्या सेलु येथे तहसीलदार असताना औरंगाबाद येथील विमान तळावर त्यांच्याकडे विना परवाना बंदुकीतील काडतुसे सापडली होती त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिंतूरमध्ये तहसीलदार पदावर असताना एकाच दिवसात रोजगार हमी योजने अंतर्गत 100 कोटींच्या विहिरी आणि रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले. परभणीत येथे आरडीसी असताना २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. जिंतुरच्याच प्रकरणात त्यांच्या मालमतेची चौकशी ए सी बी कडून सुरु आहे. हे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत त्यांना महत्वाच्या कार्यकारी पदावर पदस्थापना देऊ नये असे आदेश असताना त्यांना परभणीत महत्वाचं पद देण्यात आलं.