वॉशिंग्टन: करोनाच्या संकटाशी संपूर्ण जग दोन हात करत आहे. मात्र, करोनाच्या संकटापेक्षाही आणखी भयंकर संकट ओढवणार असल्याचा गंभीर इशारा अमेरिकेतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी दिला आहे. जगभरात सध्या असलेली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता हे दोन संकट फारशी दूर नसल्याचे त्यांनी सांगितले. अणू युद्ध आणि ग्लोबल वार्मिंग ही दोन्ही संकटे मानवी संस्कृतीच्या विनाशाची कारणं ठरू शकतात, असेही त्यांनी म्हटले.
एका मुलाखतीत नॉम चॉम्स्की यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात करोनाची महासाथ आली. त्यामुळे धोका अधिकच आहे. करोनाचे संकट मोठे आहे. त्याला मातही देऊ. मात्र, अन्य दोन संकटांचा सामना करणे अशक्यच असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या हाती एकवटत जाणारी ताकद हे या विनाशाचे मूळ कारण ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

त्यांनी पुढे म्हटले की, करोनाच्या काळाता मोठा विरोधाभास दिसून येत आहे. क्यूबा युरोपला मदत करत आहे. तर, जर्मनी ग्रीसला मदत करण्यास तयार नाही. आपल्याला नेमके कसे जग हवे आहे, याचा विचार करण्यासाठी करोनाने आपल्याला संधी दिली आहे. सार्स विषाणूंचा आजार काही बदलांसह पुन्हा येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. श्रीमंत देशांनी संभाव्य करोना आजाराच्या दृष्टीने लस शोधणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे काहीच केले नाही. मोठ्या औषध कंपन्यांनी त्यांना अडवले. आता करोनाचे संकट आले असताना मनमानीपणे औषधे आणि लशीचा व्यवसाय होणार असल्याचे चॉम्स्की यांनी सांगितले. करोनाच्या संकटाची चाहूल लागली असताना औषध कंपन्यांनी नवीन सौंदर्य प्रसाधनावर भर दिला असल्याची तिरकस टिप्पणी त्यांनी केली