रत्नदीप शेजावळे
जिंतूर दि-१०/९

जिंतूर तालुक्यातील वझर-धमधम-कोरवाडी-कवडा या मार्गावर पडलेल्या खड्यांतुन नागरिकांची सुटका व्हावी यासाठी परभणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पावसाळ्या अगोदरच खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु सदरील रस्त्यावर अजुनही खड्डे कायम असल्याने या परिसरातील दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना खड्यांतुन मार्ग काढुन जिंतूरला पोहचावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करणाऱ्या संबंधित गुत्तेदारा विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबद्दल कवडा ग्रामपंचायत कार्यालयाने जिंतूर सा.बां.विभागाकडे तक्रार सादर केली आहे. सदरील रस्त्याच्या डागडुजीचे काम हे अत्यंत बोगस असून केवळ लाखो रुपये हडण्यासाठी थातुरमातुर पद्धतीने डागडुजी केल्याचा आरोपसादर तक्रारीत करण्यात आला आहे. सदरील डागडुजी कामाची चौकशी करून संपूर्ण चौकशी होई पर्यंत केलेल्या कामाची रक्कम अदा करण्यात येऊ नये,असे ग्रामपंचायतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेत परभणी सा.बां.विभाग कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अभियंता सा.बां.विभाग परभणी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळा संपत आला,लाखो रुपयांचा खर्च झाला तरी या रस्त्यावर खड्डे कायम असल्याने ग्रामीण भागात विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची वास्तवात किती प्रमाणात अंमलबजावणी केली जाते,याचे कवडा-कोरवाडी वझर-धमधम हे ज्वलंत उदाहरण आहे. आजवरच्या चौकशीत गुत्तेदार खूप कमी प्रमाणात दोषी आढळतात परंतु, याकामी चौकशी करणारे सा.बां.विभाग परभणीचे उपविभागीय अभियंता या रितीला छेद देतील अशी नागरिकांत चर्चा आहे.