रत्नदीप शेजावळे
जिंतूर दि-(१८/०७)

जिंतूर तालुक्यातील ईटोली येथील सुरेश उर्फ लाला जयस्वाल या बेकायदेशीर दारू विक्रेत्यास दारूचा व्यवसाय करण्यासाठी मदत करणार्‍या सहा पोलीस कर्मचार्‍यांविरूध्द परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आज शुक्रवार दि.१८ जुलै रोजी कारवाई करून
जिंतूर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचार्‍याला शासकीय सेवेतून बडतर्फ, चार जणांना निलंबीत तर एकाची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. 

जिंतूर पोलिस ठाण्याचे ASI परमेश्वर काकडे यांना बेकायदेशीर दारूविक्रेत्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून मदत केल्याच्या आरोपावरून आज बडतर्फ करण्यात आले. तर पोलीस हवालदार शेख अजगर, नामदेव डुबे, राहुल शेळके आणि साजीद लाला या चौघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सिध्देश्वर चाटे यांची परभणी मुख्यालयास बदली करण्यात आली आहे.

जिंतूर तालुक्यातील ईटोली येथील रहिवासी सुरेश उर्फ लाला जयस्वाल याचा बेकायदेशीर दारू विक्रीचा मोठा व्यवसाय आहे.  लॉकडाऊनच्या काळात त्याने जिंतूर पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने संपुर्ण तालूक्यात बेकायदेशीर दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली आहे. जयस्वाल याने एका स्कॉर्पिओ मधून गावागावात दारू पोहोचवून दारूचा व्यवसाय केला. गेल्या महिन्यात जिंतूर -येलदरी रोडवर जाणारी स्कॉर्पिओ जीप थांबवून जिंतूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी चौकशी केली असता त्यामध्ये दारूचा अवैध साठा आढळून आला. जीप चालकासह एका आरोपीस अटक करून पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, सदरील मुद्देमाल सुरेश उर्फ लाला जयस्वाल याचा असल्याची माहिती अटकेतील आरोपींनी दिली. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी तात्काळ सुरेश जयस्वाल यास अटक केली. त्याचा मोबाईलही जप्त केला. त्यास जिंतूर न्यायालया समोर उभे करून पोलीस कस्टडीची मागणी केली असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी जयस्वाल यास  सुनावली. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता अनेक महिन्यांपासून सुरेश जयस्वाल याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. जिंतूर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यासह परभणी स्थानिक गुन्हे शाखेचेही काही पोलिस कर्मचारी जयस्वाल यास मदत करत होते. या सर्वांची आर्थिक देवाणघेवाण सुरू होती हे तपासात निष्पन्न झाले आहे. जयस्वाल याच्या मोबाईलमध्ये त्या सर्वांचे संभाषण असल्याचाही पुरावा श्रवण दत्त यांच्या हाती लागला. ही सर्व माहिती श्रवण दत्त यांनी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना सांगून या सर्व पोलिस कर्मचार्‍यांविरूध्द कारवाईची शिफारस केली. त्यावरुन जिंतूर जिंतूर पोलीस ठाण्यातील सहा कर्मचार्‍यांवर आज कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात परभणी एलसीबीचे तीन पोलीस कर्मचारी हे गेल्या महिन्यात निलंबित करण्यात आले आहेत.