काल रात्री ठाणे शहरात दोन अल्पवयीन तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत उच्छाद मांडला व केवळ चाळीस मिनिटात पाच जणांकडून पैसे आणि मोबाईल लुटले. हा सर्व थरार रात्री साडे बाराच्या सुमारास कापूरबावडी येथून सुरु झाला. सोळा सतरा वर्षांच्या दोन तरुणांनी एक स्कुटर चोरली व लुटालुटीचे सत्र सुरु झाले. कामावरून घरी परतणाऱ्या प्रदिपकुमार जैनवर चॉपरने हल्ला करून त्याचे पाकीट पळविले. यात प्रदिपकुमार याला दुखापत झाली. तिथून हे युवक नितीन कंपनी, रेमंड कंपनी, चितळसर भागात लुटालूट करत आणि प्रतिकार करेल त्याला चॉपर ने जख्मी करत सुटले. त्यांचा हा थैमान तब्बल चाळीस मिनिटे सुरु होता. याची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी नाकाबंदी केली व पाठलाग करत मोठ्या शिताफीने त्यातील एका माथेफिरुला जेरबंद केले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी महाप्रयासाने दुसऱ्या आरोपीला काही वेळातच अटक केली व त्यांच्याकडून 3 चाकू, चोरलेले मोबाईल व रोकड जप्त करण्यात आली. दोघांना भिवंडीच्या बालन्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली. अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनायकुमार राठोड यांनी दिली. केवळ चांगले कपडे घेता यावेत यासाठी या दोघांनी हे गंभीर कृत्य केल्याची माहिती समोर येत असली तरी पोलिसांनी मात्र तपास सुरु असल्याचे सांगितले.