Gopichand Padalkar News

Jitendra Awhadv,Gopichand Padalkar News UPdate:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. ‘पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू;’असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी कोल्हापुरात दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, प्रदेश सरचिटणीस भैय्या माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, सरचिटणीस अनिल साळुंखे यांनी या संदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या पडळकर यांनी शरद पवार यांची माफी मागावी. मुळात पडळकर यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे, त्याच्या दुप्पट वर्ष पवार यांनी राजकारण, समाजकारण आणि बहुजनांच्या कल्याणार्थ खर्च केली आहेत. पडळकर यांचे आता जे वय आहे, त्या वयात पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून त्यांनी घोर विश्वासघात केला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

     

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.