सुभास पगारे..

जिशान सलीम सिद्दीकी, वय २० वर्षे, राहणार खाँजानगर, उस्मानाबाद हा दि.११ जुलै २०२० रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोबाईल फोन दुरुस्तीचा बहाना करुन घराबाहेर पडला परंतु घरी परतला नाही. यावर त्याच्या कुटुंबीयांनी सायंकाळीच पोलीस ठाण्यात जिशान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. ही हकीकत पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांना समजताच त्यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांना संबंधीत तरुणाचा शोध घेण्यास सांगीतले. यावर पोलीस पथकाने जिशानच्या सोशल मिडीया अकाऊंटची सखोल माहिती घेतली असता त्या तरुणाचे तथाकथित पाकिस्तानी तरुणीशी प्रेमसंबंधाने चॅटींग सुरु असल्याचे व भेटीसाठी ती तरुणी त्याला पाकिस्तानात बोलवत असल्याचे निदर्शनास आले.
          उस्मानाबाद पोलीसांच्या सायबर सेलने आधुनिक तंत्रज्ञानाने जिशानचा ठावठिकाणा प्राप्त केला. यावर तो गुजरातच्या कच्छ परिसरात असल्याचे समजले. पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी ही हकीकत व जिशानची छायाचित्रे कच्छ पुर्व चे पोलीस अधीक्षक व इतर तपास यंत्रणांना कळवून त्यांच्याशी चर्चा केली. उस्मानाबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. दि.१६ जुलै रोजी जिशान कच्छच्या वाळवंटातून पाकिस्तान सीमेकडे मोटारसायकल वरुन जात असतांना त्याची बाईक वाळूत फसल्याने त्याने ती सोडून देउन पाकिस्तान सीमेच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याची बेवारस मोटरसायकल बीएसएफ च्या गस्ती पथकास आढळली होती. तर रात्री १० च्या सुमारास जिशान बीएसएफ बटालीयन क्र.१५० च्या पथकास हाती लागला होता. जिशान यास आणन्यास उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शकील शेख यांसह पथक दि.१७ जुलै रोजी गुजरात येथे रवाना झाले होते परंतु भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे जिशान सिद्दीकी याच्या विरुध्द गुजरात राज्यातील कच्छ विभाग, गांधीधाम जिल्ह्यातील खदीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्याने उस्मानाबाद पोलीस पथकास जिशानचा ताबा मिळाला नव्हता. उपरोक्त गुन्ह्यात जिशान सिद्दीकी याची गुजरात मधील न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्याने उस्मानाबादचे सह पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांचे पथक गुजरात राज्यात रवाना झाले. जिशान सिद्दीकी यास दि. २७ जुलै रोजी ताब्यात घेउन आज दि. २९ जुलै रोजी उस्मानाबाद येथे आणुन त्याचे वडील सलीम निजामोद्दीन सिद्दीकी यांच्या ताब्यात देण्यात आले. उस्मानाबाद पोलीस व सायबर सेलच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.