रायगड : अरविंद गुरव

पेण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तालुक्यात आज (20जून) चार पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून, यामध्ये रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाऊनशिपमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. याचबरोबर तालुक्यात आजअखेर बाधित रुग्णांची संख्या पन्नाशी पार गेली आहे.

पेण तालुक्यात आज पुन्हा चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाऊनशिपमधील 52 वर्षीय व्यक्तीला आणि 21 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांची कोव्हीड-19 टेस्ट आज पॉझिटीव्ह आली आहे. याशिवाय उत्कर्षनगर पेण येथे एका 37 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तसेच झोतिरपाडा येथील 51 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दोघांचीही कोव्हीड टेस्ट आज पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती पेण तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आजअखेर पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली आहे. यापैकी 21 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर सद्यस्थितीत 30 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये पेण नगरपालिका हद्दीतील 13 तर पेण ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे.