गेल्या काही दिवसांपुर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर मुंबईतील मालाड-मालवणी भागाचा दौरा करून मालवणीत हिंदू व दलित बांधवावर अत्याचार होत आहेत ; असं खळबळजनक विधान करून मालवणीत पुर्णत: अस्तित्वहीन बनलेल्या आपल्या पक्षाला उर्जा देण्यासाठी भाजपाच्या परंपरेला अनुसरून धर्माचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात भाजपाची एकूणच राजकीय भीस्त धर्मावर आधारित ध्रुविकरणाच्या राजकारणावर असल्याने त्यांच्या राजकिय संस्कृतीला शोभेल असच त्यांचं हे विधान होतं. त्यामुळे माध्यम जगतात देखील त्यांच्या ह्या विधानाची फारशी कोणी दखल घेतली नाही. लोढा यांनी ट्विटरवर टिवटिवाट करुन कितीही आपली छाती बडवून घेतली तरी माध्यमांमध्ये आपली कोणीही दखल घेत नाही, हे उमगल्यावर त्यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या तरूण भारत नावाच्या भाजपाचा धार्मिक अजेंडा चालवणाऱ्या वृत्तपत्राला हाताशी धरून एक लंबा चौडा लेख छापुन आणला.

 या वृत्तपत्राच्या संपादक महोदयांनी एखाद्या काल्पनिक चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असा लांबलचक लेख लिहून आपल्या मालकाप्रती आपण किती वफादार आहोत याचच प्रात्यक्षिक दिलं. त्यांच्या ह्या लेखात आकडेवारी, काही घटना जर खरच घडल्या असतील तर त्या घटनांचे संदर्भ देऊन आपल्या मालकाच्या भूमिकेचं अभ्यासपूर्ण समर्थन करणं गरजेचं होतं. अर्थात भाजपाच्या मुशीत तयार झालेले नेते व संघाच्या पगारावर जगणारे स्वयंघोषित पत्रकार यांच्याकडून वैचारिक व अभ्यासपूर्ण मांडणीची अपेक्षा करणही मुर्खपणाच आहे.

 लोकशाहीत पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हटलं जातं. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपिठ उपलब्ध करुन देणं ही जशी पत्रकारांची जबाबदारी आहे तशीच समाजात शांतता, एैक्य,सलोखा व सौहार्दपूर्ण वातावरण अबाधित राहिल याची काळजी घेणं ही देखील पत्रकारांची जबाबदारी आहे. अनेक पत्रकार त्यांची ही जबाबदारी इमानेइतबारे पार पाडतातही पण ज्यांनी पत्रकारीतेची सर्वच नीतिमुल्य भाजपाच्या दावणीला बांधून ठेवलीत ते 'तरुण भारत'चे संपादक महोदय भाजपा नेत्यांची लाळ देखील आपल्यासाठी अमृत आहे असं समजून चाटताना दिसतात तेव्हा यांच्या बुद्धीचीच नव्हे तर जीवनाची किव करावीशी वाटते. आपण जे काही लिहितोय त्याने देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या गाभ्यावरच आपण घाव घालतोय याचं साधं भानही संपादक महोदयांना व भाजपाच्या मंगलप्रभात लोढा यांना राहिलं नाही. समाजात जे विष आपण पेरतोय त्या विषाचे थेंब  कधी काळीआपल्या घरापर्यंत देखील पोहोचतील आणि  त्याची चव आपल्या मुलाबाळांना देखील चाखावी लागेल हे समजण्या इतपत देखील प्रगल्भता भाजपा मुंबई अध्यक्षांना नसावी यापेक्षा शोकांतिका ती काय..?

 ज्या मालवणीत लोढा गरळ ओकुन गेले ; त्या मालवणीचा दौरा कधीतरी लोढा यांनी गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये करावा. ही मालवणी ईदच्या दिवसांमध्ये हिरवा शालू नेसते तर  गणेशोत्सवामध्ये याच मालवणीमध्ये भगव्याची उधळण असते. आंबेडकरांच्या जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मालवणीतून येणारा जयभिमचा घोष आसमंतात घुमत असतो. जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा येथे साजरा होणारा गणेशोत्सव पाहुन असा भास होतो की इथे १००% हिंदू लोकवस्ती आहे. तर ईदच्या वेळी हिच मालवणी मुस्लिम बहुल वाटू लागते. पण भिम जयंती येताच पुन्हा हिच मालवणी दलित बांधवांची भासू लागते. देशात अन्यत्र कुठेही दिसणार नाही एवढं धार्मिक एैक्य व सामाजिक सलोख्याचं दर्शन याच मालवणीमध्ये घडतं. श्री. गणेशाच्या मिरवणूकीत भाविकांना पाण्याच्या बाटल्या वाटणारे मुस्लिम बांधव असतात तर ईदमध्ये मुस्लिम बांधवांसोबत बसून जेवणारे हिंदू बांधव असतात.

 हे धार्मिक एैक्य व सामाजिक सलोखा या मालवणीत अबाधित आहे याचं कारण या मालवणीचं नेतृत्व गेली दोन दशकं अस्लम शेख नावाचा एक धर्मनिरपेक्ष तरुण करत आहे. जो राजकारणाच्या पलिकडे जाऊन विकासाचं व्हिजन मांडतो. जो स्वत:मुस्लिम असून देखील मंदिरं बांधतो. मुस्लिम बांधवांप्रमाणेच हिंदूंच्याही सणांमध्ये समरस होतो. धर्माचं राजकारण करणाऱ्यांचे डोळे आपल्या अद्वितिय पराक्रमाने दिपवतो. मालवणीला आग लावायची भाषा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पराभवाची चव याच मालाडच्या मातीत चाखवतो. या मालवणीतील जनतेला स्वत:च्या परिवारासारखं सांभाळतो. अर्थात आता कुठे हाफ चड्डीवरुन फुल पॅंटवर आलेल्यांना हे सांगून काय उपयोग.

 हिंदू-दलित अत्याचाराच्या गोष्टी करणाऱ्या लोढा यांनी आधी त्यांच्या टाॅवर्समध्ये मराठी बांधवांना घरं द्यावीत नंतरच त्यांचं विषारी तत्त्वज्ञान मालवणीत पाजळायला यावं.

 मालवणीत आज जर जवळवास ७३ हजार मुस्लिम बांधव असतील तर ५२ हजार पेक्षा जास्त हिंदू आहेत. जर खरच इथे हिंदू बांधवांवरती अत्याचार होत असतील तर हिंदूंची एवढी लोकसंख्या या मालवणीत कशी..?? लोढा व त्यांच्या संपादक महोदयांनी या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आणि जर त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर त्यांनी कबुल कराव की हा सगळा खटाटोप दिडदमडीच्या सांप्रदायिक राजकारणासाठीच होता. लोढांनी एक तर आता बाप दाखवावा किंवा श्राद्ध घालावं. मालवणीत खरच हिंदू व दलित बांधवांवरती  अत्याचार होतात हे आकडेवारी व घटनांचे संदर्भ देऊन सिद्ध करावं नाहीतर आपल्या पक्षाच्या श्राद्धाचा कार्यक्रम याच मालवणीत आयोजित करावा.

 हा तो देश आहे, ज्या देशातील फकिर व सन्याशांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातात हात घालून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या होत्या स्वातंत्र्यासाठीचं पहिलं बंड फकिर व संन्याशांचं होतं. या देशात तुमंचं धर्माच्या कुबड्या घेऊन चाललेलं सांप्रदायिक राजकारण दीर्घकाळ टिकणारं नाही.

 शेवटी संत तुकोबांच्या शब्दांमध्येच सांगेन, " भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । 

 ही मालवणीची जनता शांत, संयमी, सहिष्णू व प्रेमळ आहे. पण ही जनता मुर्ख नक्कीच नाही. जर पुन्हा या मालवणीत सांप्रदायिकतेचं विष पेरायला याल तर तुमच्या माथ्यावर अशी काही काठी बसेल की, त्या काठिची जखम आयुष्यभर भरली जाणार नाही..!!

काँग्रेस पक्ष कार्यकर्त्या..तर्फे वरील पोस्ट खूप व्हायरल केली जात आहे......