प्रणया खोचरे

   मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबई मनपाच्या हद्दीत दररोज २० टक्के पाणीकपात करण्याची तयारी झाली आहे.
   मुंबईला  पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा आहे. तलावांच्या भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे मुंबई मनपाच्या हद्दीत दररोज २० टक्के पाणीकपात  करण्याची तयारी झाली आहे. ही पाणीकपात १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. पाऊस पडला आणि पाणीसाठा वाढला तर टप्प्याटप्प्याने ही पाणीकपात कमी केली जाणार आहे. मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल  यांनी ही माहिती दिली.    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा, मोडकसागर या तीन मोठ्या तलावांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याच कारणामुळे पाणीबचत करणे आवश्यक आहे. पाणीकपात करुन शिल्लक पाणीसाठ्याचा दीर्घकाळ वापर करण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मुंबई मनपाचे आयुक्त चहल म्हणाले. पाऊस पडून तलावांतील पाणीसाठा वाढावा, हीच आमची इच्छा आहे. पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होईपर्यंत पाणीकपात करुन पाणी वाचवणे हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
   पालिका नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एक बैठक होणार आहे. या बैठकीत पाणीकपातीवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले. मुंबईत पाऊस व्यवस्थित सुरू आहे. मात्र तलावांच्या भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस अद्याप झालेला नाही, असे आयुक्त म्हणाले. वेधशाळेने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या कालावधीत तलावांच्या भागात अपेक्षित पाऊस झाला तर पाणीकपात कमी अथवा रद्द करण्याचा विचार करता येईल. मात्र सध्याच्या परिस्थितीत खबरदारी म्हणून पाणीकपात आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले. मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.