बोरिवली येथील भगवती हॉस्पिटलचा दोन वर्षांपासून बंद असलेला अतिदक्षता विभाग सोमवारपासून (२२ जून) सुरू होत आहे. महाराष्ट्राचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा विभाग सोमवारी सुरू होत आहे. 
   मुंबईतील दहिसर, कांदिवली, बोरिवली आणि मालाड येथील सततच्या वाढत्या रुग्णांचा आढावा घेतला असता अधिक प्रमाणात रुग्ण हे या ठिकाणी आढळत असल्याचे निदर्शनास येते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरिवली येथे मनपाचे भगवती हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये ६९ बेडची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच ICU विभागात दहा बेड असतील. पाच व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या ICU साठी अनुभवी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रवीण दरेकर यांनी हॉस्पिटलची क्षमता आणखी वाढवण्याची सूचना केली आहे. ही सूचना अंमलात आणण्यासाठी आवश्यक ते उपाय लवकरच करण्याचे आश्वासन मुंबई मनपाने दिले आहे.