कोरोनामुळे सध्या आपले सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत.  त्याचा फटका जसा आपल्या दैनंदिन जीवनावर खूप मोठ्या प्रमाणावर झालाय तसाच तो शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा दिसून येतोय.  मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा-कॉलेज बंद आहेत.  आज जवळजवळ तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय आणि परिस्थिती फारशी काही बदलली नाही उलट बिकट होत चाललीय.  सुरुवातीच्या काळात (एप्रिल-मे) बऱ्याच संस्थानी आपला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला.  घरडा अभियांत्रिकी कॉलेज ने देखील त्याच पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला.  त्याचा फायदा विध्यार्थीना भविष्यात नक्कीच होईल यात काहीच शंका नाही. मागील शैक्षणिक वर्ष संपून परिस्थिती लवकर सुधारेल असं वाटत होत पण तस काही झाल नाही आणि बहुतांश ठिकाणी परीक्षा रद्द झाल्या (विशेषतः महाराष्ट्रात).  आधी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या आणि नंतर काही दिवस चतुर्थ वर्षाच्या परीक्षेचा निर्णय रेंगाळत असताना त्याही परीक्षा रद्द झाल्यात असं तरी दिसतंय.  ह्या सर्व कालावधीत सर्वात जास्त मनस्ताप हा विध्यार्थी आणि पालक वर्गाला सहन करावा लागला (तसा अजूनही होतच आहे).  ह्याच कालावधीत घरडा अभियांत्रिकी कॉलेज ने पालक सभा घेऊन थोडाफार का होईना त्यांना आधार दिला.  पण पालकांचे काही प्रश्न अनुत्तरित आहेत जसे नवीन वर्ष केव्हा सुरु होणार? बाहेरून येणाऱ्या विध्यार्थीचं काय?  वर्ग सुरु झाले तर सोशल डिस्टंसिन्गचं पालन विध्यार्थी करतील का? असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले.  
ह्या सर्व कालावधीत विद्यापीठाने उन्हाळी सुट्टी मे-जून पर्यंत वाढवून परिस्थिती सुधारेल असं वाटत असतानाच शासनाने लॉकडाऊन शिथिल केला कारण तसं करण्याशिवाय काही पर्यायचं नव्हता.  पण शाळा-कॉलेज बंद च ठेवण्याचा निर्णय घेतला.  मुलांची सुरक्षितता पाहता हा निर्णय चांगलाच म्हणावा लागेल.  पण पुढील शैक्षणिक वर्षाचं काय? ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू करायचं झाल्यास तेवढी सुविधा उपलब्ध आहे का? कारण खेड्यापाड्यात अजूनही मोबाईल ला नेटवर्क नाही तिथे ऑनलाईन वर्ग शक्य आहे का?  किंवा त्याला अजून काही पर्याय उपलब्ध करून देता येईल का?  त्यातच निसर्ग वादळाने जून च्या पहिल्या आठवड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात  नुकसान केलय की परिस्थिती सुधारायला बराच वेळ लागेल. विशेषतः रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, माणगाव,  अलिबाग आणि पेण व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि  मंडणगड. अजूनही विजेचा प्रश्न सुटलेला नाही.  लोणेरे विद्यापीठातील काही प्राध्यपकांनी तर वीज आल्यानंतर व्हाट्स अप स्टेटस ठेवले होते.  ह्यावरून परिस्थिती चा अंदाज तुम्हाला आला असेलच.  एवढं सगळं असताना ऑनलाईन शिक्षण.  पण असं म्हटलंय की.. शो मस्ट गो ऑन..मग ह्या सर्व परिस्थिती वर मात करून जर पुढे जायचं असेल (विशेषतः खेड्यातील विध्यार्थी की ज्यांची लढण्याची तयारी ही लहानपणापासूनच असते) मग शिक्षण हे सुरु करावंच लागेल मग कितीही अडचणी आल्या तरी.  जर आपण ऑनलाईन वर्ग जुलै पासून सुरु केले तर... पुढील शैक्षणिक वर्ष (विद्यापीठाच्या आधीच्या वेळापत्रकानुसार) सुरळीत चालू होऊन पुढील तीन ते चार महिने किंवा परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत (ज्या विद्यार्थीना शक्य होईल.. किमान 60 टक्के विध्यार्थी तरी त्याचा लाभ घेतील) तरी असे करता येईल.  ज्या विद्यार्थी ना ऑनलाईन वर्ग शक्य नाही अशांची व्यवस्था जर त्या त्या कॉलेज ने केली (विडिओ, नोट्स इत्यादी साहित्य पुरवून) तर अभ्यास ही पूर्ण होईल आणि नंतर चा ताणही कमी होईल (पालक आणि विध्यार्थी दोघांचाही). तसेच एकदा का परिस्थिती कॉलेज सुरु होण्यायोग्य झाली की पुन्हा ज्यादा वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. ह्या कालावधीत शिक्षकांनी विध्यार्थ्यांपर्यत पोहोचणे खूप गरजेचे आहे.  पालक सभा, विध्यार्थीची ग्रुप मीटिंग असे पर्याय निवडता येऊ शकतात.  पण सध्या तरी ऑनलाईन शिवाय पर्याय नाही असच चित्र दिसतंय.  आधीच शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेणारे विध्यार्थी संभ्रमात आहेत आणि जर पुढील काळात तांत्रिक कौशल्य आणि नियमित अभ्यासापासून असा विध्यार्थी दूर राहिला तर नोकरी शोधताना त्याची आणि पालकांची कसरत होईल. 
येणाऱ्या काळात शिक्षक म्हणून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती पूर्ण करू यात काही शंका नाही. 


लेखक -

डॉ. संदीप हसुराम घरत (दादर-पेण)
प्राध्यापक-घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय खेड