मुंबईः राज्यात ३० जूननंतरही लॉकडाऊन कायम असणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व अर्थचक्र गतीमान व्हावं यासाठी अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

निर्बंध शिथील होत असले तरी मुंबईकरांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पोलिसांनीही १ जुलैनंतर नियमांचे पालन करण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं आहे. राज्य सरकारतर्फे मिशन बिगीन अगेनअंतर्गंत अनेक परवानग्या देण्यात येत आहेत. असं असलं तरी करोनाचा धोका अद्याप कायम आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी सोशल डिस्टनसिंगचं पालन करावं व नियम पाळावेत, अशा सूचना मुंबई पोलिसांनी केल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या सूचना

१. फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर पडा
२. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
३. घरापासून फक्त २ कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. २ कि.मी. च्या बाहेर जाऊ नये.
४. व्यायामाची परवानगी घरापासून २ किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित
५. कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 2 कि.मी. च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
६. सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
7. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
८ सोशल डिस्टनसिंगचे निकष न पाळणारी दुकानं बंद करण्यात येतील.
9. रात्री ०९ ते पहाटे पाच दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल
१०. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळुन येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.