मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण झाली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली असून त्यांनीच तशी माहिती दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केलं आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याने गडाख होम क्वॉरंटाइन झालेले आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही करोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोविड चाचणी केली असता त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांनी होम क्वॉरंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे. शेख यांनी ट्विट करून तशी माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी तात्काळ करोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच होम क्वॉरंटाइन असल्याने घरूनच काम करणार असल्याचं सांगतानाच या काळात कुणालाही भेटणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शेख यांची प्रकृती ठिक असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, काल मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांची संख्या ५ हजार ७११ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून सरासरी ५५ दिवसांवर पोहोचला. तर रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन १.२६ टक्के झाला आहे.